मलकापूर हादरले! अब्दुल हमीद चौकात तरुणावर लाठ्याकाठ्यांनी जीवघेणा हल्ला
अजय टप
मलकापूर, (प्रतिनिधी): शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. किरकोळ कारणावरून वाद उकरून काढत भरचौकात तरुणांना मारहाण आणि जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार समोर आला असून, यामुळे मलकापूर शहरात खळबळ माजली आहे. या प्रकरणी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
शहरातील रामदेवबाबा नगर परिसरात राहणारा सनी भारत खरारे (वय २० वर्षे) हा शुक्रवारी संध्याकाळी ७.४५ च्या सुमारास आपल्या मित्रासह अब्दुल हमीद चौकातून जात होते. यावेळी पूर्ववैमनस्यातून किंवा वर्चस्वाच्या वादातून आरोपींनी त्यांना घेरले. मुद्दसीर मनसुर खान (वय २१ वर्षे) याने फिर्यादीच्या मित्राला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद इतका विकोपाला गेला की, मुद्दसीरने हातातील लाकडी काठीने सनीच्या मित्राच्या उजव्या पायावर जोरदार मारहाण केली. तसेच आरोपी शेख जावेद शेख रशीद (वय ३६ वर्षे) रा. सायकलपुरा) आणि त्याच्यासोबत असलेल्या दोन अनोळखी इसमांनी सनी खरारे आणि त्यांच्या मित्राला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. तुम्हाला “आज जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी देत आरोपींनी परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. भरचौकात झालेल्या या राड्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. दरम्यान,शहरातील प्रतिष्ठित नागरिकांनी वेळीच धाव घेत मध्यस्थी केल्याने मोठा अनर्थ टळला.
घटनेनंतर जखमींनी तात्काळ ग्रामीण रुग्णालय गाठून वैद्यकीय उपचार घेतले. वैद्यकीय अहवाल आणि सनी खरारे यांच्या तोंडी रिपोर्टवरून मलकापूर शहर पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. शहरातील शांतता अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी आरोपींच्या लवकरात लवकर मुसक्या आवळाव्यात, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन कौळासे हे करत आहेत.

