धामणगाव धाड,(प्रतिनिधी): जिद्द आणि मेहनतीचा प्रवास जर प्रामाणिक असेल, तर यश नक्कीच मिळते, हे धामणगाव धाड येथील जीवन सर्जेराव आहेर याने सिद्ध करून दाखवले आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या टेरिटोरियल आर्मी भरतीच्या निकालात जीवनची निवड झाली असून, संपूर्ण गावात सध्या आनंदाचे वातावरण आहे.
‘सैनिकांचे आणि पोलिसांचे गाव’ अशी ओळख असलेल्या धामणगाव धाडमधील जीवनची परिस्थिती अत्यंत बेताची होती. मात्र, लहानपणापासूनच उराशी बाळगलेले देशसेवेचे स्वप्न त्याला स्वस्थ बसू देत नव्हते. मर्यादित साधनसामग्री, आर्थिक अडचणी आणि सामाजिक आव्हाने अशा अनेक संकटांवर मात करत त्याने शारीरिक तंदुरुस्ती आणि लेखी परीक्षेची तयारी करून आपली निवड निश्चित केली.
जीवन आहेरच्या निवडीची बातमी गावात धडकताच ग्रामस्थांनी त्याचे जंगी स्वागत केले. डीजेच्या तालावर गावातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी ज्येष्ठ नागरिक, मित्रमंडळ आणि तरुणांनी त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. धामणगावचे नाव उज्वल करणाऱ्या या ‘फौजी’चा सत्कार करताना संपूर्ण गाव अभिमानाने भारावून गेले होते.
तरुणांसाठी प्रेरणास्थान
धामणगाव धाडने यापूर्वी अनेक अधिकारी देशाला दिले आहेत. आता जीवन आहेरच्या निवडीमुळे गावातील इतर तरुणांनाही सैन्य दलात जाण्यासाठी एक नवी प्रेरणा मिळाली आहे. “कठोर परिश्रम आणि जिद्द असेल तर कोणतेही स्वप्न पूर्ण होऊ शकते,” हा संदेश जीवनच्या या यशातून अधोरेखित झाला आहे. सोबतच प्रादेशिक सेनेत भरती होणे हे केवळ नोकरी मिळवणे नसून, राष्ट्राच्या सुरक्षेसाठी खारीचा वाटा उचलण्याची संधी आहे, अशा भावना यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.
Leave a comment