क्राईम जगत

खळबळजनक! ‘धनंजय मुंडे’कडून अल्पवयीन मुलीचे अपहरण

अजय टप

मलकापूर, (प्रतिनिधी): बुलढाणा जिल्ह्यातील राजकारणात आणि समाजकारणात सध्या एकाच नावाची चर्चा वारंवार होताना दिसते. मात्र, यावेळी ही चर्चा विकासकामांची नसून एका अत्यंत गंभीर आणि संतापजनक गुन्ह्याची आहे. ज्या नावाभोवती राज्यातील राजकारण फिरते, अगदी तसेच नाव असलेल्या एका व्यक्तीने चक्क १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या ‘हाय-प्रोफाईल’ वाटणाऱ्या नावामुळे काही काळ पोलीस प्रशासनापासून ते सर्वसामान्यांपर्यंत सर्वांच्याच भुवया उंचावल्या गेल्या.

राजकीय वर्तुळात आणि समाजमाध्यमांवर ज्या नावाचा मोठा दबदबा आहे, अशाच नावाच्या एका २४ वर्षीय तरुणाने एका गरीब शेतमजूर मातेच्या काळजाचा तुकडा पळवून नेला असा आरोप होत आहे. नव्हेतर ८ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास किनगाव राजा परिसरात ही घटना घडली असून ३५ वर्षीय फिर्यादी मातेने आपल्या मुलीच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांकडे धाव घेत पोलिसांत तक्रार दिली आहे. दिलेल्या तक्रारीतून समोर आलेले आरोपीचे नाव ऐकून पोलीसही क्षणभर चक्रावून गेले नसतील, तर नवल!

कोण आहे तो ‘धनंजय मुंडे’?

सर्वत्र चर्चा सुरू झाली की, हा ‘धनंजय मुंडे’ नेमका कोण? ज्याने दिवसाढवळ्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्याचे धाडस केले? सत्तेच्या वर्तुळात वावरणाऱ्या मोठ्या नेत्याशी नाव साधर्म्य असल्याने या प्रकरणाला वेगळेच वलय प्राप्त झाले आहे. मात्र, हा आरोपी किनगाव राजा येथीलच धनंजय ज्ञानेश्वर मुंढे (वय २४ वर्षे) हा असल्याचे तपासात समोर आले आहे. या आरोपीचा राजकारणाशी थेट संबंध नसला, तरी त्याच्या या कृत्यामुळे संपूर्ण परिसरात घृणा व्यक्त केली जात आहे.

या प्रकरणी किनगाव राजा पोलिसांत भारतीय न्याय संहिताचे कलम १३७ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, आरोपी धनंजय मुंढे याने पीडित मुलीस अज्ञात कारणासाठी पळवून नेल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेने परिसरात एवढी खळबळ उडवून दिली आहे की, नावाच्या साधर्म्यामुळे अनेकांना हे प्रकरण राजकीय दबावाचे वाटू लागले होते.

पोलिसांचा तपास युद्धपातळीवर

ठाणेदार साहेबांच्या आदेशानुसार, तपासाची सर्व सूत्रे पोलीस अंमलदार अनिल नागरे यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत. आरोपी धनंजय मुंढे याच्याबाबत काही माहिती मिळाल्यास तात्काळ किनगाव राजा पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *