मलकापूर (प्रतिनिधी): एकीकडे सरकार ‘झाडे लावा, झाडे जगवा’चा नारा देत कोट्यवधी रुपये खर्च करत असताना, दुसरीकडे मलकापूर नगर परिषदेच्या जलशुद्धीकरण केंद्र परिसरात भरदिवसा हिरव्यागार झाडांची अमानुष कत्तल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेला दोन दिवस उलटूनही नगर परिषद प्रशासनाने कोणतीही कायदेशीर तक्रार दाखल न केल्याने, “प्रशासन दोषींना पाठीशी घालत आहे का?” असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे. याप्रकरणी ‘प्रहार स्टाईल’ने आंदोलन करण्याचा इशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे उपजिल्हा प्रमुख अजय टप यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
८ मार्च रोजी जलशुद्धीकरण केंद्र परिसरात असलेली मोठी हिरवीगार झाडे कटर मशीनच्या सहाय्याने कोणतीही परवानगी न घेता तोडण्यात आली. या वृक्षतोडीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, ज्या नगर परिषदेवर वृक्षसंवर्धनाची जबाबदारी आहे, त्याच विभागाच्या हद्दीत ही ‘कत्तल’ झाली आहे. वृक्षतोड झाल्यानंतर प्रशासनाने कठोर कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र, नगर परिषद प्रशासनाने केवळ बाजूलाच असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावून आपली जबाबदारी झटकल्याची चर्चा आहे. जर झाडे विनापरवाना तोडली गेली, तर थेट फौजदारी गुन्हा दाखल करण्याऐवजी नोटीसचा खेळ का खेळला जात आहे? असा सवाल अजय टप यांनी निवेदनातून विचारला आहे.
गुन्हा दाखल करा, अन्यथा गाठ आमच्याशी!
झाडे कोणाच्या सांगण्यावरून आणि का तोडण्यात आली, याची सखोल चौकशी व्हावी. दोषींवर तातडीने गुन्हे दाखल करण्यात यावेत. प्रशासनाने टाळाटाळ केल्यास प्रहार जनशक्ती पक्ष स्वतः पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देईल. मागण्या मान्य न झाल्यास नगर परिषद प्रशासनाविरोधात ‘प्रहार स्टाईल’ने तीव्र जनआंदोलन उभारले जाईल. “एकीकडे वृक्षारोपणावर लाखो रुपये खर्च करायचे आणि दुसरीकडे डौलाने उभी असलेली झाडे कापणाऱ्यांना पाठीशी घालायचे, हा दुटप्पीपणा खपवून घेतला जाणार नाही.”, असा इशाराही प्रहार जनशक्ती पक्षाचे उपजिल्हा प्रमुख अजय टप यांनी दिला आहे.

Leave a comment