स्मार्ट बुलढाणा

मलकापूर पालिकेचं ‘महागडे’ प्रेम चर्चेत!

अजय टप

मलकापूर,(प्रतिनिधी): प्रेम आंधळं असतं असं म्हणतात, पण मलकापूर नगरपालिकेत हे प्रेम चक्क ‘खर्चिक’ असल्याचं समोर आलं आहे. विदर्भाच्या प्रवेशद्वारी असलेल्या या पालिकेच्या भांडार विभागाला एका साध्या रजिस्टरवर इतकं प्रेम जडलं की, त्यांनी त्यासाठी चक्क ३५०० रुपयांचे ‘आमंत्रण’ धाडले आहे.

सामान्यतः बाजारात गेल्यावर जे रजिस्टर काही शंभर रुपयांत लाजून-बुजून पदरात पडतं, त्याच रजिस्टरसाठी पालिकेने तिजोरीची द्वारं सताड उघडी केली. हे रजिस्टर साधं-सुधं नसून, याच्या प्रत्येक पानावर कदाचित ‘गुलाबाचा सुगंध’ किंवा ‘सोनरी शाई’ असावी, अशी चर्चा आता शहराच्या नाक्यानाक्यावर रंगू लागली आहे.

प्रेमाचा हा ‘महागडा’ हिशोब बघितल्यास उपरोक्त रजिस्टरची बाजारातील किंमत काही शंभर रुपये (गरीब बिचारं प्रेम). मात्र, नगरपालिकेची किंमत ३ हजार ५०० रुपये (शाही थाटातील रोमान्स) आहे. त्यामुळे या रजिस्टरमध्ये अशा कोणत्या ‘प्रेमविणलेल्या’ नोंदी होणार आहेत, की ज्याची किंमत इतकी वाढली?, शहरात आता चर्चा सुरू आहे की, या ३५०० रुपयांच्या रजिस्टरमध्ये भ्रष्टाचाराच्या ‘कविता’ लिहिल्या गेल्या आहेत की काय? वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाच्या प्रेमात पडणार की या ‘अजब-गजब’ रोमान्सचा पडदा फाडणार, याकडे साऱ्या मलकापूरकरांचे लक्ष लागले आहे.

चौकशीची ‘विरह’ वेदना!

नागरिकांच्या मनात आता एकच शंका आहे—हे रजिस्टर आणि भांडार विभाग यांच्यातील हे ‘गुपित’ नातं नेमकं काय? या खरेदीच्या प्रक्रियेत नियमांचे ‘मदनाचे बाण’ चालले की अधिकाऱ्यांच्या डोळ्यावर ‘अर्थपूर्ण’ पट्टी बांधली गेली?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *