अजय टप
मलकापूर (प्रतिनिधी): समाजकारण, धर्मकारण आणि न्याय क्षेत्रात आपल्या निःस्वार्थ सेवेने ठसा उमटवणारे ज्येष्ठ समाजसेवक, श्री क्षेत्र धुपेश्वर संस्थानाचे अध्यक्ष आणि प्रख्यात विधिज्ञ अँड. महादेवसिंह रावळ यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने मलकापूर शहरासह संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली असून, एका कर्तृत्ववान युगाचा अंत झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
ॲड.महादेवसिंह रावळ यांनी मलकापूर वकील संघाचे दीर्घकाळ सचिव म्हणून धुरा सांभाळली. वकिली व्यवसायात त्यांनी नेहमीच सत्याची आणि तत्त्वांची कास धरली. त्यांच्या स्पष्टवक्ती भूमिकेमुळे आणि सहकाऱ्यांविषयी असलेल्या जिव्हाळ्यामुळे वकील बांधवांमध्ये ते ‘डँडी’ या टोपणनावाने अत्यंत लोकप्रिय होते. एक निर्भीड आणि निष्ठावान वकील म्हणून त्यांचा मोठा लौकिक होता. भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या महादेवसिंह रावळ यांच्या मावशी होत्या. त्यांच्याच विशेष पुढाकारातून मलकापूर येथे जिल्हा व सत्र न्यायालयाला मंजुरी मिळाली आणि भव्य न्यायालयीन इमारत उभी राहिली. या महत्त्वाच्या कार्यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, न्यायासाठी होणारी भटकंती थांबली आहे. त्यांच्या अंत्ययात्रेला हजारो नागरिकांनी उपस्थिती लावली होती. वकील बांधव, राजकीय मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांच्या उपस्थितीने मलकापूर परिसर फुलून गेला होता. हा उसळलेला जनसागर त्यांच्या लोकप्रियतेची साक्ष देऊन गेला.
धार्मिक आणि सामाजिक कार्याचा वारसा
श्री क्षेत्र धुपेश्वर संस्थानाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी धार्मिक परंपरांचे जतन करतानाच अनेक सामाजिक उपक्रम राबवले. गरजूंना मदत करणे आणि समाजातील ऐक्य टिकवून ठेवणे यासाठी त्यांनी आयुष्यभर कष्ट घेतले. त्यांचा अजातशत्रू स्वभाव आणि संयमी व्यक्तिमत्त्वामुळे समाजातील सर्व स्तरांतील नागरिक त्यांच्याशी जोडलेले होते. रावळ हे केवळ एक व्यक्ती नव्हते, तर ते मलकापूरचा आधारवड होते. त्यांच्या जाण्याने समाजाची मोठी हानी झाली आहे, अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या.

Leave a comment