अजय टप
मलकापूर,(प्रतिनिधी): मेहकर तालुक्यातील पांगरखेड येथील एक २० वर्षीय तरुणी शिक्षणासाठी जाते असे सांगून घरून गेली. मात्र, ती महाविद्यालयात पोहोचलीच नसल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली. याप्रकरणी डोणगाव पोलीस स्टेशनमध्ये मुलीचे वडील विलास मधुकर नालिंदे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी मिसिंग दाखल केली आहे.
पांगरखेड (ता.मेहकर) येथील रहिवासी प्रियंका विलास नालिंदे (वय २० वर्षे) ही तरुणी हिवरा आश्रम येथे शिक्षणासाठी जाते. २७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास प्रियंका ‘मी कॉलेजला जाते’ असे सांगून घरातून निघाली. मात्र, सायंकाळ होऊनही ती घरी परतली नाही. कुटुंबीयांनी तिच्या मोबाईलवर वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु तिने सुरुवातीला फोन उचलला नाही आणि त्यानंतर तिचा मोबाईल बंद येऊ लागला. मुलगी घरी न परतल्याने हवालदिल झालेल्या नालिंदे कुटुंबाने तातडीने हिवरा आश्रम येथील तिच्या कॉलेजच्या वसतिगृहात धाव घेतली. तेथे चौकशी केली असता एक धक्कादायक बाब समोर आली. वसाहतगृहाच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले की, प्रियंका हिने “मी आजारी आहे” असा रजेचा अर्ज दिला होता आणि ती १४ फेब्रुवारी २०२६ पासूनच वसतीगृहात आली नव्हती. ही माहिती मिळताच कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकली. वडिलांनी प्रियंकाच्या मैत्रिणी, वर्गमित्र, नातेवाईक आणि गावातील ओळखीच्या लोकांकडे सर्वत्र शोध घेतला, मात्र तिचा कुठेही पत्ता लागला नाही.
या प्रकरणी विलास नलिंदे यांनी डोणगाव पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी हरवल्याची तक्रार दाखल केली आहे. मुलीचा रंग गोरा, उंची ५ फूट, बांधा सडपातळ असून तिने अंगात पांढऱ्या रंगाचा (भूरकट रंगाचे नक्षीकाम असलेला) पंजाबी ड्रेस घातलेला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस अंमलदार ईश्वर सोनूने हे करीत आहेत. वरील वर्णनाची तरुणी आढळून आल्यास किंवा तिच्याबाबत काहीही माहिती मिळाल्यास तातडीने डोणगाव पोलिसांशी संपर्क साधवा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
Leave a comment