मलकापुरात चोरट्यांचा धुमाकूळ!
अजय टप
मलकापूर (प्रतिनिधी): शहरात आणि परिसरात चोरीच्या घटनांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. मलकापूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या अणुराबाद शिवारात एका शेतकऱ्याच्या वाड्याचे पत्रे वाकवून चोरट्यांनी ७३ हजार ६०० रुपये किमतीची १६ क्विंटल तूर लंपास केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
अणुराबाद येथील रहिवासी मयुर राजेंद्र नारखेडे (वय २१ वर्षे) या तरुण शेतकऱ्याने आपल्या शेतातील तुरीची मळणी करून पीक घरात आणले होते. ही तूर त्यांनी युरियाच्या एकूण ८० गोण्यांमध्ये भरून ठेवली होती (अंदाजे ४० क्विंटल). हे सर्व उत्पन्न त्यांनी गावाशेजारीच असलेल्या त्यांच्या मालकीच्या वाड्यामध्ये, एका पत्र्याच्या खोलीत सुरक्षित ठेवले होते. १२ मार्च २०२६ च्या सायंकाळी ६.३० वाजेपासून ते १३ मार्च २०२६ च्या सकाळी ७ वाजेच्या दरम्यान, अज्ञात चोरट्यांनी संधी साधून या वाड्यावर डल्ला मारला. चोरट्यांनी वाड्याच्या मुख्य दरवाजाचा विचार न करता मागील बाजूने लोखंडी टिन पत्र्याच्या खोलीचे पाठीमागचे पत्रे वाकवून चोरट्यांनी आत प्रवेश केला. खोलीत साठवून ठेवलेल्या ८० गोण्यांपैकी ३५ थैल्या तूर (अंदाजे १६ क्विंटल) चोरट्यांनी वाहनाद्वारे लंपास केली. चोरीला गेलेल्या मालाची एकूण किंमत ७३ हजार ६०० रुपये आहे.
सकाळी ही बाब लक्षात येताच मयुर नारखेडे यांनी मलकापूर शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५, ३३४ (१) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप राठोड हे करीत आहे. महिनाभर घाम गाळून पिकवलेले धान्य अशा प्रकारे चोरीला गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी गस्त वाढवण्याची मागणी आता जोर धरत आहे.

