अजय टप
मलकापूर, (प्रतिनिधी): लोणार तालुक्यातील चिखला काकड येथे गावातील राजकारणावरून आणि जुन्या वादातून एका ४० वर्षीय शेतकऱ्याला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी बिबी पोलीस स्टेशनमध्ये चौघांविरुद्ध भारतीय न्याय संहिताचे विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिखला काकड (ता.लोणार) येथील रहिवासी असलेले विष्णु मानीकराव सानप (वय ४० वर्षे) हे १३ मार्च २०२६ रोजी रात्री ९.२० वाजेच्या सुमारास आपल्या घरी असताना, आरोपी कैलास प्रकाश जावळे याने त्यांना गावातील वादावर चर्चा करण्यासाठी आपल्या घरी बोलावले. सानप हे आपल्या मोटारसायकलने जात असताना गजानन महाराज मंदिराजवळ कैलास जावळे त्यांना रस्त्यातच भेटला. प्रत्यक्षदर्शी आणि फिर्यादीनुसार, कैलास जावळे हा त्या वेळी दारूच्या नशेत होता. त्याने विष्णु सानप यांना अडवून, “तू गावात राजकारण केले आहेस आणि संजीवनी वाघ हिच्या पाठीमागे राहून संपूर्ण गाव पेटवून दिले आहेस,” असा आरोप केला. यावर सानप यांनी “मी कोणतेही राजकारण केले नाही किंवा माझा कशातही सहभाग नाही, तू दारू पिऊन मला असे बोलू नको,” असे उत्तर दिले. या उत्तरामुळे संतप्त झालेल्या कैलास जावळे याने हातातील एका वस्तूने सानप यांच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात सानप यांचे डोके फुटून ते रक्तबंबाळ झाले. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेल्या सुरज शांतीराम गरकळ याने मध्यस्थी करून सानप यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाद तिथेच थांबला नाही. आरोपी नागेश प्रकाश जावळे याने सानप यांना धरून जबरदस्तीने शाळेजवळ असलेल्या आपल्या घराकडे नेले. तिथे कैलास जावळे, त्याची पत्नी आशामती कैलास जावळे, नागेश जावळे आणि उषा नागेश जावळे या सर्वांनी मिळून सानप यांना चापटबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.
या घटनेनंतर जखमी विष्णु सानप यांनी तत्काळ बिबी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून उपरोक्त आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८ (१), ११५ (२), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस अंमलदार दिनेश चव्हाण हे करत आहेत.

Leave a comment