सिंदखेड राजा जवळ भीषण अपघात: आयशरच्या धडकेत ८ जण गंभीर जखमी
आनंद इंगळे
सिंदखेड राजा (प्रतिनिधी): मेहकर ते सिंदखेड राजा रोडवरील पळसखेड शिवारात भरधाव वेगाने येणाऱ्या एका ट्रकने (आयशर) समोरून जाणाऱ्या वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात वाहनातील तब्बल ८ जण गंभीर जखमी झाले असून, अनेकांना फ्रॅक्चर झाले आहे. याप्रकरणी सिंदखेड राजा पोलीस स्टेशनमध्ये आरोपी चालकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भोसा (ता. सिंदखेड राजा) येथील रहिवासी विष्णू गुलाब शेळके (वय ४५ वर्षे) हे ११ मार्च २०२६ रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास त्यांच्या गावातील अशोक लेलँड कंपनीच्या गाडी क्रमांक एमएच-२८-बीबी-४८८० ने काही ग्रामस्थांसह पिंपळगाव लेंडी येथे जात होते. पळसखेड शिवारात आले असता, पाठीमागून येणाऱ्या अशोक लेलँड कंपनीच्या दुसऱ्या एका ट्रक क्रमांक एमएच-१६-सीसी-६८७१ ने त्यांच्या वाहनास जोरदार धडक दिली.
हा अपघात इतका भीषण होता की, धडक बसल्यानंतर वाहनातील प्रवासी जागीच फेकले गेले. आरोपी चालकाने आपले वाहन भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे चालवून हा अपघात घडवून आणल्याचे तक्रारीत नमूद असून अपघातामध्ये उत्तम शेळके, कैलास कळकुंबे, संगीता ज्ञानेश्वर कळकुंबे, सोपान भगवान दिघोळे, ज्ञानेश्वर तुकाराम कळकुंबे, गजानन विनायक शेळके, नामदेव खुशालराव शेळके आणि परसराम शेळके जखमी झाले असून त्यांना नजीकच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून, काहींच्या हात-पायांना गंभीर फ्रॅक्चर झाल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणी दोन दिवसांनी, म्हणजेच १३ मार्च २०२६ रोजी सिंदखेड राजा पोलिसांनी एमएच-१६-सीसी-६८७१ चा चालक याच्यावर भारतीय न्याय संहिताचे कलम २८१, १२५ (a), १२५ (b), ३२४ (४) सह मोटार वाहन कायद्याच्या कलम १३४/१७७ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार प्रभाकर सानप हे करत आहेत.

