क्राईम जगत

मलकापुरात किरकोळ कारणावरून राडा; लोखंडी पाईपने प्राणघातक हल्ला

अजय टप

मलकापूर (प्रतिनिधी): शहरातील मुस्ताक अलीनगर परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान तुंबळ हाणामारीत झाले. सकाळी लागलेल्या धक्क्याचा राग मनात धरून दोन तरुणांनी एकाच कुटुंबातील पाच ते सहा जणांवर लोखंडी पाईपने हल्ला चढवला. या घटनेत अनेक जण जखमी झाले असून, मलकापूर शहर पोलिसांनी दोन आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

शहरातील मुस्ताक अलीनगरमधील रहिवासी असलेजे शेख रिजवान शेख समशेर (वय ३८ वर्षे) यांचा भाचा आणि आरोपी जबीर खान इसा खान यांच्यात सकाळी किरकोळ धक्का लागल्यावरून बाचाबाची झाली होती. याच वादाचा वचपा काढण्यासाठी १५ मार्च २०२६ रोजी रात्री ७.४५ वाजेच्या सुमारास मुस्ताकीया मशीद परिसरातील पारपेठ येथे आरोपी जबीर खान याने फिर्यादीच्या भाच्याला गाठले. “तू मला सकाळी धक्का का दिला?” असे म्हणत त्याने मारहाण सुरू केली. भाच्याचा आरडाओरडा ऐकून फिर्यादी शेख रिजवान, त्यांचे भाऊ शेख सोहेब, शेख सहेजाद, शेख सोहिल आणि अनिस मलिक हे सर्वजण मध्यस्थी करण्यासाठी धावून आले. भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत असतानाच, आरोपी जबीर खान याने घरातील लोखंडी पाईप आणला आणि बेदम मारहाण सुरू केली.

आरोपीने शेख सोहेब आणि अनिस मलिक यांच्या डोक्यात पाईप मारून त्यांना गंभीर जखमी केले. तसेच शेख सहेजाद याच्या तोंडावर वार केल्याने तो रक्ताळला. याच वेळी दुसरा आरोपी शेख सरफराज शेख आरिफ (वय २५ वर्षे) यानेदेखील फिर्यादी शेख रिजवान यांच्या पोटात व पायावर मारहाण केली, तर त्यांचा भाचा सोहिल याच्या छातीवर आणि डोक्यावर पाईपने प्रहार करून जखमी केले.

या हल्ल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. जखमींना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. फिर्यादी शेख रिजवान यांनी दिलेल्या तक्रारीवरून मलकापूर शहर पोलिसांनी आज १६ मार्च रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास आरोपी जबीर खान इसा खान ( वय१८ वर्षे), शेख सरफराज शेख आरिफ (वय २५ वर्षे) याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८(१), ३५२, ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेश रोकडे हे करीत आहेत. किरकोळ धक्क्यावरून झालेल्या या हिंसक घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *