राजकारण

भाजप आणि प्रहारचा मतदानावर बहिष्काराचा इशारा; जिल्हाधिकाऱ्यांना पुराव्यांसह निवेदन सादर

बुलढाणा, (प्रतिनिधी) : बुलढाणा जिल्ह्यातील धाड परिसरातून लोकशाहीला काळीमा फासणारा एक अत्यंत गंभीर आणि खळबळजनक प्रकार समोर आला आहे. प्रशासनाच्या डोळ्यात धूळ फेकून आणि बनावट कागदपत्रांच्या जोरावर चक्क १५०० परप्रांतीयांची नावे स्थानिक मतदार यादीत घुसवण्यात आल्याचे बोलल्या जात आहे. या ‘बोगस मतदार फॅक्टरी’चे धागेदोरे थेट आसाम राज्यापर्यंत जोडलेले असून, यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली आहे. नव्हेतर भारतीय जनता पार्टी आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्या शिष्टमंडळाने आज, १७ मार्च रोजी जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांची भेट घेऊन त्यांना पुराव्यांसह निवेदन सादर केले. जोवर ही १५०० बोगस नावे मतदार यादीतून बाद केली जात नाहीत, तोवर निवडणुका घेऊ नका, अन्यथा संपूर्ण धाड नगरी मतदानावर बहिष्कार टाकेल, असा आक्रमक पवित्रा घेतला आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद आहे की, आसाममधील धुबरी (७८३३२४) येथील मूळ रहिवासी असलेल्या मोनजुमा खातून नावाच्या महिलेचा आधार अपडेट रेकॉर्ड समोर आला आहे. अत्यंत चलाखीने बनावट संमतीपत्र किंवा भाडेकराराच्या आधारे तिचा पत्ता बदलून ‘आझाद चौक, धाड, बुलढाणा’ असा करण्यात आला. याच बनावट पुराव्याच्या आधारे निवडणूक ओळखपत्र (उदा. Voter ID No. UEY4749982) मिळवून तिचे नाव स्थानिक मतदार यादीत समाविष्ट करण्यात आले. हा केवळ एक नमुना असून, असे शेकडो परप्रांतीय मजूर धाडमध्ये ‘स्थानिक’ बनवून बसले आहेत.

धाडमध्ये विविध कामांसाठी परप्रांतातून येणाऱ्या मजुरांची संख्या मोठी आहे. याच मजुरांना राजकीय स्वार्थासाठी ‘व्होट बँक’ म्हणून वापरले जात असल्याचा आरोप होत आहे. बनावट दाखले आणि आधार कार्डातील छेडछाड करून मतदार यादी फुगवण्यात आली आहे. जर हे दीड हजार बोगस मतदार मतदान करणार असतील, तर स्थानिक जनतेचा कौल आणि लोकशाहीचा मूळ गाभाच नष्ट होईल, अशी भीती व्यक्त केली आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणावर परप्रांतीयांची नावे यादीत समाविष्ट होताना स्थानिक बीएलओ, तलाठी आणि निवडणूक विभाग झोपला होता का? कागदपत्रांची पडताळणी का झाली नाही? असे प्रश्नही उपस्थित करण्यात आले असून यामध्ये एखाद्या मोठ्या संघटित टोळीचा किंवा राजकीय हस्तक्षेपाचा हात असल्याची शक्यता वर्तवली असून प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येऊन बोगस नावे वगळण्यात यावेत, बोगस कागदपत्रे तयार करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी देखील भाजपचे डॉ. तेजराव नरवाडे, ॲड. सुनील देशमुख, ॲड. मोहन पवार, विशाल विसपूते, किरण सरोदे, गणेश बाजी, विष्णू वाघ, प्रविण वाघ, वैभव कोप्पे, राजू नाटेकर, दत्ता शेवाळे, तसेच प्रहारचे वैभवराजे माहिते, सोनू वाघ, राजू शिंदे, गणेश जाधव, अजय शिंदे, सचिन नेमाने, अनंत उबाळे, सुनील वाघ, नीलेश चिंचोले यांच्यासह असंख्य ग्रामस्थांनी केली आहे. कारवाई न झाल्यास मतदानावर बहिष्कार टाकण्याच्या इशाराही देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *