क्राईम जगत

मलकापुरात गॅस रिफिलिंगच्या काळ्याबाजारावर पोलिसांचा हातोडा

अजय टप

मलकापूर (प्रतिनिधी): शहरातील नागरी वसाहतींमध्ये अत्यंत धोकादायक पद्धतीने घरगुती गॅस सिलिंडरमधून वाहनांमध्ये गॅस भरणाऱ्या अवैध अड्ड्यांवर खामगाव अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पथकाने मंगळवारी (१७ मार्च) रात्री मोठी कारवाई केली. मुश्ताकअलीनगर, शिवाजीनगर आणि संत श्री रविदासनगर या भागात एकाच वेळी छापे टाकून पोलिसांनी १ लाख ३ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, एकूण पाच जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हे दाखल केले आहेत.

मलकापूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील विविध भागात सार्वजनिक वितरण प्रणालीतील (रेशनचे) आणि घरगुती वापराचे एलपीजी गॅस सिलिंडर बेकायदेशीरपणे जमवून, त्यातून इलेक्ट्रिक मोटार आणि प्रेशर पंपाच्या साहाय्याने वाहनांमध्ये गॅस भरला जात असल्याची गोपनीय माहिती अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन आर. पाटील आणि त्यांच्या पथकाने मंगळवारी सकाळी १०.३० च्या सुमारास संशयास्पद ठिकाणांवर पंचासमक्ष छापे टाकले.

या कारवाईत पोलिसांनी जाकीरखान सिकंदरखान (वय ३७ वर्षे) रा. मुश्ताक अलीनगर, पारपेठ, नितीन गुणाजी परसे (वय ४२ वर्षे) रा. संत श्री रविदासनगर, लक्ष्मण मोहन हंबडे (वय ३२ वर्षे) रा. शिवाजीनगर, शेरसिंह घनश्यामसिंह राजपूत (वय ४० वर्षे) रा. काशीरामपुरा, शाकीरखान सिकंदरखान (वय ४१ वर्षे) रा. मुश्ताकअलीनगर या आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर भारतीय न्याय संहिताचे कलम २८४, २८५ आणि भारतीय जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५ च्या कलम ३ व ७ अन्वये गुन्हा गुन्हा दाखल केला. या छाप्यात गॅस चोरीसाठी वापरले जाणारे टायटन, ग्लोटेक आणि सर्टिफाइड कंपन्यांचे एकूण ४ वजनकाटे, १.०, १.५ आणि २.० हॉर्स पॉवरच्या विविध कंपन्यांच्या विद्युत मोटारी, रबरी नळ्या, पितळी नोझल्स आणि इलेक्ट्रिक बोर्ड, भारत गॅस कंपनीचे व्यावसायिक वापराचे रिकामे सिलिंडर, असा एक लाख तीन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेश रोकडे हे करत आहेत. भरवस्तीत सुरू असलेल्या या अवैध गॅस रिफिलिंगच्या अड्ड्यांवर पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे शहरातील अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. अशा प्रकारच्या कृत्यांमुळे सामान्य जनतेचा जीव धोक्यात येत असल्याने नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले आहे.

जीविताला धोका अन् काळाबाजार

हा सर्व प्रकार अत्यंत भयावह होता. आरोपी ज्या ठिकाणी गॅस रिफिलिंग करत होते, तो परिसर दाट लोकवस्तीचा आहे. एलपीजी गॅस हा अतिज्वलनशील पदार्थ असतानाही, कोणत्याही सुरक्षेविना विद्युत मोटारींच्या साहाय्याने तो हाताळला जात होता. यामुळे परिसरात मोठी स्फोटक स्थिती निर्माण झाली होती. रहिवाशांच्या जीविताची पर्वा न करता केवळ स्वतःच्या फायद्यासाठी हा जीवघेणा खेळ सुरू होता. तसेच, घरगुती वापराच्या सिलिंडरचा तुटवडा असताना, हे सिलिंडर चढ्या भावाने विकून शासनाच्या नियमांची पायमल्ली केली जात होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *