खामगावात विनापरवानगी पुतळा बसविल्याप्रप्रकरणी १० जणांवर गुन्हे दाखल
अजय टप
मलकापूर, (प्रतिनिधी) : स्थानिक नगर परिषद टर्निंग, रेल्वे स्टेशन गेटच्या बाजूला असलेल्या राष्ट्रीय महामार्ग उपविभागाच्या जागेवर मध्यरात्रीच्या सुमारास अनधिकृतपणे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा अर्धाकृती पुतळा बसवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी खामगाव शहर पोलिसांनी १० जणांसह इतर काही लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून शहरात या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवार १७ मार्च २०२६ च्या मध्यरात्री २ ते २.३० वाजेच्या सुमारास काही तरुणांनी नगर परिषद टर्निंग परिसरात असलेल्या राष्ट्रीय महामार्ग उपविभागाच्या मालकीच्या जागेवर अतिक्रमण केले. कोणत्याही शासकीय विभागाची किंवा जिल्हाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी न घेता, या ठिकाणी लोखंडी पाईप उभा करून त्यावर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा अर्धाकृती पुतळा बसविला. ही जागा रेल्वे स्टेशन गेटच्या अगदी जवळ असून राष्ट्रीय महामार्गाच्या अखत्यारीत येते.
या घटनेची माहिती मिळताच महसूल आणि पोलीस प्रशासनात धावपळ उडाली. जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतिबंधात्मक आदेशांचे (कलम ३७ (१) (३)) उल्लंघन केल्याप्रकरणी आणि शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी आनंदमोहन रामलाल अहिर (वय ५८ वर्षे) रा. सतीफैल, खामगाव यांनी फिर्याद दिली.
त्यानुसार, खामगाव शहर पोलिसांनी भारतीय न्याय संहिताचे कलम १८९ (२) (३), २२३, ३ (५) तसेच महाराष्ट्र नगर परिषद व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम १७९ आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम १३५ नुसार आरोपी कृष्णा सुभाष नाटेकर (वय ३२ वर्षे) रा. कोठारी फैल, सनी सुरेश बोरकर ( वय २२ वर्षे) रा. धोबी खदान, रुपेश अवचार (वय ३० वर्षे) रा. माखरीया मैदान, करण सकळकळे ( वय २५ वर्षे) रा. ठाकूर वाडा, कृष्णा वासुदेव बोदडे (वय ३५ वर्षे) रा. दालफैल, नामदेव बाभुळकर (वय ३६ वर्षे) रा. दालफैल, चेतन इंगळे ( वय ३५ वर्षे) रा. धोबी खदान, आशु खंडारे (वय २८ वर्षे) रा. महाकाल चौक, लखन नाटेकर (वय २९ वर्षे) रा. महाकाल चौक, कृष्णा कांबळे ( वय २२ वर्षे) रा. घारोड यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार रामेश्वर फासे हे करीत आहेत.
वरिष्ठ अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव
घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलीस अधिकारी पाटील आणि खामगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक पवार यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

