धडक बातमी: धाडच्या आठवडी बाजारात मानवी आरोग्याशी जीवघेणा खेळ
अभिनय बोर्डे
धाड, (प्रतिनिधी): एकीकडे सरकार ‘स्वच्छ भारत’ अभियानाचा ढोल वाजवत असताना, दुसरीकडे बुलढाणा जिल्ह्यातील धाड येथील आठवडी बाजारात मात्र प्रशासनाच्या नाकाखाली मानवी आरोग्याची अक्षरशः थट्टा मांडली जात आहे. ज्या जागेवर नागरिक उघड्यावर शौचास बसतात, त्याच घाणीच्या साम्राज्यात बसून शेतकऱ्यांना भाजीपाला आणि खाद्यपदार्थ विकावे लागत आहेत. प्रशासनाच्या या अमानवीय आणि बेजबाबदार कारभाराविरुद्ध आता प्रहार जनशक्ती पक्षाने आक्रमक पवित्रा घेतला असून, येत्या सात दिवसांत तोडगा न निघाल्यास विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवर जनआंदोलन छेडण्याचा इशारा वैभवराजे मोहिते यांनी दिला आहे.
धाड येथील आठवडी बाजार सध्या ज्या जागेवर भरतो, ती जागा म्हणजे नरकच ठरत आहे. स्थानिक नागरिक या जागेचा वापर ‘हागणदारी’ म्हणून करत आहेत. त्याच अस्वच्छ ठिकाणी बसून व्यापारी आणि शेतकरी अन्नपदार्थांची विक्री करतात. हा प्रकार केवळ संतापजनक नसून सार्वजनिक आरोग्य नियमांचे उघड उल्लंघन आहे. “आम्ही काय खातोय आणि काय विकतोय?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ च्या नियमांना येथे पायदळी तुडवले जात आहे.
कर वसुलीत आघाडी, सुविधांत ‘शून्य’!
स्थानिक स्वराज्य संस्था (ग्रामपंचायत/नगर परिषद) बाजारात येणाऱ्या व्यापाऱ्यांकडून नियमितपणे ‘बाजारपट्टी’ वसूल करते. मात्र, बदल्यात पिण्याचे पाणी, सावलीसाठी ओटे किंवा स्वच्छ जागा यांसारख्या मूलभूत सुविधा देण्यास प्रशासनाला वेळ नाही. वसुलीच्या नावाखाली व्यापाऱ्यांची लूट होत असून त्यांना चिखल आणि घाणीच्या साम्राज्यात उभे राहून व्यवसाय करावा लागत आहे. ही जागा ‘बुडीत क्षेत्रात’ येत असल्याने पावसाळ्यात येथे रोगराईचे मोठे संकट उभे ठाकले आहे.
संविधानाने दिलेल्या जगण्याच्या अधिकारावर घाला
भारतीय संविधानाच्या कलम २१ नुसार प्रत्येक नागरिकाला स्वच्छ आणि आरोग्यदायी वातावरणात जगण्याचा अधिकार आहे. मात्र, धाडमधील या परिस्थितीमुळे नागरिकांच्या या मूलभूत अधिकाराचा गळा घोटला जात आहे. प्रशासनाचे हे जाणीवपूर्वक दुर्लक्ष म्हणजे कर्तव्यात केलेली कसूर असल्याची भावना व्यक्त होत असून येथील आठवडी बाजारासाठी तात्काळ हक्काची आणि स्वच्छ जागा उपलब्ध करून द्यावी. जोपर्यंत नवीन जागा मिळत नाही, तोपर्यंत सध्याच्या जागेचे नियमित निर्जंतुकीकरण प्रशासनाने करावे. बाजारस्थळी पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह आणि कचरा व्यवस्थापनाची चोख सोय असावी, अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. सात दिवसांच्या आत प्रशासनाने ठोस पावले उचलली नाहीत, तर विदर्भ आणि मराठवाडा सीमेवरील सर्व नागरिक आणि व्यापारी रस्त्यावर उतरतील. या आंदोलनामुळे उद्भवणाऱ्या सर्व परिस्थितीला केवळ आणि केवळ प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही वैभवराजे मोहिते यांनी दिला आहे.

