क्राईम जगत

चेक बाउन्स ! आरोपीस तीन महिन्यांचा सश्रम कारावास !

बुलडाणा,(प्रतिनिधी )- धनादेश अनादर प्रकरणात बुलढाणा येथील न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवत तीन महिन्यांचा सश्रम कारावास आणि २ लाख ८० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. या निर्णयामुळे आर्थिक व्यवहारांमध्ये प्रामाणिकपणाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा येथील रहिवासी संदीप अच्युतराव गवई यांनी आरोपी नरेंद्रसिंग रामसिंग राजपूत यांना एक लाख सत्तर हजार रुपये उसने दिले होते. मात्र, ठरलेल्या मुदतीत आरोपीने ही रक्कम परत केली नाही. वारंवार मागणी करूनही पैसे न मिळाल्याने अखेर आरोपीने फिर्यादीस १.७० लाख रुपयांचा धनादेश दिला.

दरम्यान, संबंधित धनादेश बँकेत सादर केला असता तो अनादरित (बाउन्स) झाल्याने फिर्यादीने ॲड. गुणवंत नाटेकर यांच्या मार्फत न्यायालयात तक्रार दाखल केली. या प्रकरणी न्यायालयात सविस्तर सुनावणी झाली. सुनावणीअंती अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१ च्या कलम १३८ अंतर्गत आरोपी नरेंद्रसिंग राजपूत यास दोषी ठरवले. त्यानुसार न्यायालयाने आरोपीस ०३ महिन्यांचा सश्रम कारावास तसेच २,८०,००० रुपये (अक्षरी रुपये दोन लाख ऐंशी हजार) दंड ठोठावला आहे. ही शिक्षा फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ च्या कलम २५५ (२) तसेच परक्राम्य संलेख अधिनियमाच्या कलम १४३ अन्वये सुनावण्यात आली. यासोबतच न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, आरोपीने दंडाची रक्कम न भरल्यास मुख्य शिक्षेबरोबरच अतिरिक्त ०१ महिन्याचा साधा कारावास भोगावा लागणार आहे.

या निकालामुळे चेक बाउन्स प्रकरणांमध्ये न्यायालयाची कठोर भूमिका पुन्हा अधोरेखित झाली असून, आर्थिक व्यवहार करताना कायदेशीर जबाबदारीचे भान ठेवणे गरजेचे असल्याचा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *