क्राईम जगत

धाड हादरले! लग्नाचे आमिष दाखवून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण

अभिनय बोर्डे

धाड,(प्रतिनिधी): राज्यात महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर असतानाच, बुलढाणा जिल्ह्यातील धाड पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चांडोळ गावातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका २२ वर्षीय नराधमाने १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून, फूस लावून पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

चांडोळ येथील रहिवासी असलेल्या एका मध्यमवर्गीय मुलगी राजेर्षी शाहू कनिष्ठ महाविद्यालय (म्हसला ब्रुद्रक) येथे विज्ञान शाखेत इयत्ता १२ वी मध्ये शिक्षण घेत आहे. नुकतीच तिने १२ वी ची परीक्षा दिली असून ती सध्या सुट्ट्यांमध्ये घरीच होती. ४ मार्च २०२६ रोजी सकाळी ९ वाजता तिचे वडील नेहमीप्रमाणे कामावर गेले होते. दुपारी १२.३० च्या सुमारास ते घरी आले असता पीडितेने त्यांना प्रेमाने जेवण वाढून दिले. जेवण आटोपून ते पुन्हा गावातील कामासाठी बाहेर पडले. मात्र, दुपारी २ वाजेच्या सुमारास त्यांच्या मुलाने दीदी घरी दिसत नसल्याचे त्यांना फोन करून सांगितले. मुलगी बेपत्ता झाल्याचे समजताच वडिलांनी तातडीने घर गाठले. त्यांनी शेजारी-पाजारी, गाव आणि सर्व नातेवाईकांकडे मुलीचा शोध घेतला, परंतु पीडितेचा कोठेही पत्ता लागला नाही. दरम्यान, मुलगी आणि गावातीलच लखन फुलसिंग मेहेर (वय २२ वर्ष) यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून संपर्क होता आणि ते एकमेकांना लपून-छपून भेटत होते, अशी माहिती पीडितेच्या वडिलांना मिळाली.

वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, लखन मेहेर यानेच मुलीला लग्नाचे आमिष दाखवले आणि फूस लावून तिला पळवून नेले आहे. पीडितेचे वय सध्या केवळ १७ वर्षे १० महिने आणि ६ दिवस इतके असून ती कायद्याने अल्पवयीन आहे. याप्रकरणी ५ मार्च २०२६ रोजी धाड पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी या प्रकरणी भारतीय न्याय संहिताचे कलम १३७(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रताप दत्तात्रय भोस यांच्या मार्गदर्शनात धाड पोलीस करीत आहेत. शिक्षणासाठी धडपडणाऱ्या एका तरुण मुलीचे अशा प्रकारे अपहरण झाल्याने आणि घटनेला पंधरा दिवस उलटूनही आरोपीचा तसेच पीडितेचा शोध न लागल्याने चांडोळ येथील नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

“थर्ड आय”च्या तपासातील धक्कादायक खुलासे; आरोपीचा पूर्वनियोजित कट!

“थर्ड आय इंटेलिजन्स ब्युरो” या खाजगी गुप्तहेर एजन्सीच्या तपासात आणि मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, आरोपी लखन मेहेर याने हे कृत्य करण्यासाठी अत्यंत नियोजनबद्ध कट रचल्याचे समोर येत आहे. आरोपीने घटनेच्या दोन दिवसांपूर्वीच चाळीसगाव येथील एका ओळखीच्या व्यक्तीच्या नावे नवीन सीम कार्ड खरेदी केले होते, जेणेकरून त्याचा मूळ ठावठिकाणा पोलिसांना लागू नये. पळून जाण्यासाठी आरोपीने स्वतःचे वाहन न वापरता गावातीलच एका मित्राची दुचाकी मागून घेतली आणि घटनेच्या दिवशी पीडितेला घेऊन तो पसार झाला. पसार झाल्यानंतर आरोपीने त्याच नवीन सिमकार्डचा वापर करून ओळखीच्या चार वेगवेगळ्या व्यक्तींना फोन केले. या व्यक्तींना विश्वासात घेऊन त्यांच्याकडून ‘फोन-पे’ द्वारे पैसे मागवून घेतले असल्याचे समजते.

पोलिसांनी या दिशेने करावा तपास

आरोपीने पसार होण्यापूर्वी वापरलेला नंबर आणि दोन दिवस आधी खरेदी केलेल्या नवीन सिम कार्डचा सीडीआर आणि एसडीआर तातडीने मिळवून संबंधित नंबरवरून ज्या ठिकाणांहून कॉल झाले, त्या टॉवर लोकेशनचे Cell ID Analysis करून आरोपीचा पसार होण्यापूर्वीचा नेमका मार्ग शोधणे, ज्या नंबरवरून कॉल करून पैसे मागवण्यात आले, त्या नंबरशी लिंक असलेल्या बँक खात्याचा किंवा UPI आयडीचा तपशील मिळवणे, चाळीसगाव येथील संबंधित व्यक्तीची ओळख पटवणे. आरोपी आणि त्या व्यक्तीमध्ये झालेले संवादाचे स्वरूप तपासून भारतीय न्याय संहिता अंतर्गत सहभागाची व्याप्ती तपासणे, सदर व्यक्ती पुण्यात कोठे वास्तव्यास आहे, याचा शोध घेऊन त्या ठिकाणी झडती घेण्याची गरज आहे. तसेच नवीन सिम कार्ड कोणत्या कागदपत्रांच्या आधारे खरेदी केले गेले, याची पडताळणी करून संशयितांचे मोबाइल हँडसेट हस्तगत करून फॉरेन्सिक विश्लेषणासाठी पाठवणे गरजेचे आहे. जेणेकरून आरोपीचा शोध घेणे सोपे होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *