अकोला

युवक-युवतींचे विवाह योग्य वयात लग्न करून दिल्यास सामाजिक समस्या दूर होतील : दीपक चोपडा

देऊळगाव राजा,(प्रतिनिधी): जैन समाजामध्ये विवाहयोग्य युवक-युवतींचे विवाह योग्य वेळी होत नसल्याने भविष्यात त्या-त्या परिवारामध्ये पारिवारिक समस्यांचा डोंगर उभा राहत आहे. हे जर टाळायचे असेल तर योग्य वयात युवक-युवतींचे विवाह त्या-त्या पालकांनी करून दिल्यास जैन समाजासमोर समस्या उभ्या राहणार नाही, असे प्रतिपादन बीजेएसचे राष्ट्रीय सचिव दीपक चोपडा यांनी केले.

भारतीय जैन संघटनेची राष्ट्रीय संवाद यात्रेचे अकोला येथे २० मार्च २०२६ रोजी शेकडो बीजेएसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्याकडून स्वागत करण्यात आले. तर ओसवाल भवनमध्ये पार पडलेल्या विदर्भ विभागीय कार्यकर्ता संवाद दरम्यान उपस्थिताना मार्गदर्शन करताना दीपक चोपडा बोलत होते. याप्रसंगी बीजेएसचे राज्य अध्यक्ष केतन शाह, महासचिव प्रवीण पारख यांनी सुद्धा उपस्थिताना मोलाचे मार्गदर्शन केले. बीजेएसच्या राष्ट्रीय व राज्यातील प्रमुख पदाधिकारी यांनी भारतातील १३ राज्यात राष्ट्रीय संवाद यात्रेच्या माध्यमातून ज्या-ज्या ठिकाणी सकल जैन समाज वास्तव्यास आहे, त्या-त्या भागात जाऊन बीजेएसच्या वतीने सुरू असलेल्या सामाजिक व इतर कार्याची माहिती देण्याचे काम सुरू केलेले आहे. दरम्यान, २० मार्च २०२६ रोजी विदर्भाच्या प्रवेशद्वारावर अकोला येथे बुलढाणा, वाशिम व अकोला जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे सोबत संवाद साधत त्यांना सखोल मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शांतीलाल मुथा, राष्ट्रीय अध्यक्ष नंदकुमार साखला यांच्या नियोजनबद्ध कार्यक्रमानुसार १३ राज्यात विविध चाप्टरच्या माध्यमातून फाउंडेशन प्रोग्रामचे आयोजन करण्यात येत आहे. या सोबतच युवती सक्षमीकरण यामध्ये वय १४ ते १८ वयामधील युवतींना आत्मनिर्भर करण्यासाठी विशेष ट्रेनर कडून तंत्रशुद्ध पद्धतीने मार्गदर्शन करण्यात येत आहे. राज्यात पाणीटंचाई पाहता संपूर्ण राज्यभर महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून ‘गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजना राबविण्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची माहिती देण्यात आली.यावेळी राष्ट्रीय सचिव दीपक चोपडा, राज्याध्यक्ष केतनभाई शहा, महासचिव प्रवीण पारख, विदर्भ अध्यक्ष कीर्तीकुमार वायकोस, राज्य कार्यकारणी सदस्य सन्मती जैन, प्रा. सुभाष गादिया, विमल जैन, निलेश गोठी, ममता जैन, बीजेएस माजी अध्यक्षा प्रेरणा शाह सह शेकडो समाज बांधव उपस्थित होते.

विवाह योग्य युवक-युवतींसाठी ‘परिणय पथ’चे आयोजन

मूल्यवर्धन शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार व महत्त्वाचे म्हणजे जैन समाजातील विवाह योग्य युवक-युवतींचे विवाह योग्यवेळेत होत नसल्याने अनेक परिवारामध्ये वेगवेगळ्या समस्या निर्माण होत आहेत. दोन्ही परिवाराकडून अपेक्षांचे गाठोडे उघडल्या जात असल्याने युवक-युवतींचे वय वाढत चालले आहे, याचा सुद्धा गांभीर्याने विचार करण्याचे सूचविण्यात येऊन बीजेएसच्या वतीने आता जिल्हा, सर्व विभागस्तरावर विवाह योग्य उच्चशिक्षित युवक-युतीसाठी ‘परिणय पथ’ या कार्यक्रमाचे आयोजन ठिकठिकाणी पंचतारांकित हॉटेलमध्ये घेण्यात येत आहे, यामध्ये संघटनेला यश येत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *