अशोक खरातने केवळ महिलांचे लैंगिक शोषण केले नाही, तर त्याचा वापर करून त्याने ‘हनीट्रॅप’चे एक मोठे जाळे विणल्याचे तपासात समोर येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, खरातने एका नामांकित उद्योगपतीला आपल्या जाळ्यात ओढले आणि त्यानंतर काही आक्षेपार्ह व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. या उद्योजकाकडून तब्बल २० कोटी रुपये उकळल्याचा संशय एसआयटीला आहे. एका बाजूला ‘शक्ती’ आणि ‘अध्यात्मा’च्या गप्पा मारणारा खरात दुसऱ्या बाजूला मोठ्या रकमांची वसुली करण्याचे नियोजनबद्ध रॅकेट चालवत होता, हे आता स्पष्ट होत आहे. या २० कोटींच्या व्यवहाराचा मागोवा घेण्यासाठी पोलीस आता खरातच्या बँक खात्यांची आणि त्याच्या निकटवर्तीयांच्या आर्थिक व्यवहारांची कसून चौकशी करत आहेत.
विधानसभेत पडसाद: गृहमंत्र्यांच्या उत्तराकडे लक्ष
अशोक खरात प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. आज विधानसभेचे कामकाज सुरू होताच विरोधक या विषयावर आक्रमक पवित्रा घेणार आहेत. “राज्यात महिला सुरक्षित आहेत का?” आणि “अशा भोंदूबाबांना कोणाचे राजकीय वरदहस्त लाभले आहेत?” असे टोकदार प्रश्न विरोधक विचारणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, विरोधकांकडे खरातचे काही राजकीय नेत्यांसोबतचे फोटो आणि व्हिडिओ असल्याचे बोलले जात आहे. यामुळे सत्ताधारी पक्षाची मोठी कोंडी होण्याची शक्यता आहे. गृहमंत्री या प्रकरणावर काय निवेदन देतात आणि या प्रकरणाचा तपास अधिक जलद करण्यासाठी काय पावले उचलतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
एसआयटीची ‘गुपित’ चौकशी आणि नवा अॅक्शन प्लॅन
गेल्या दोन तासांतील सर्वात मोठी अपडेट म्हणजे, एसआयटीने खरातची चौकशी करण्याचे ठिकाण अचानक बदलले आहे. लोकांची गर्दी आणि सुरक्षिततेचे कारण देत खरातला एका अज्ञात स्थळी हलवण्यात आले आहे. तिथे त्याची कसून उलटतपासणी सुरू आहे. जप्त केलेल्या पेनड्राइव्हमध्ये अनेक बड्या हस्तींचे व्हिडिओ असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तपासादरम्यान आणखी काही महिलांनी समोर येऊन तक्रार करण्याची तयारी दर्शवली आहे, ज्यामुळे खरातच्या अडचणीत मोठी वाढ होणार आहे.
मिरगाव फार्म हाऊसवर ‘अघोरी’ कृत्यांचा संशय
खरातच्या सिन्नर येथील मिरगाव फार्म हाऊसवर केवळ पार्ट्याच नाही, तर काही अघोरी विधी आणि महिलांचे शोषण करण्याचे प्रकार घडत होते. आज पोलिसांनी तिथल्या कर्मचाऱ्यांचे आणि पुजाऱ्यांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली आहे. “त्या फार्म हाऊसच्या भिंतींच्या मागे नक्की काय दडले आहे?” याचा शोध आता पोलीस घेत आहेत.
पांढरपेशा गुन्हेगारांचे काय?
अशोक खरात तर पकडला गेला, पण त्याला साथ देणारे, त्याला आर्थिक बळ पुरवणारे आणि त्याच्या हनीट्रॅपमध्ये सहभागी असणारे ‘पांढरपेशा’ गुन्हेगार कोण? २० कोटी रुपये देणारा तो उद्योगपती कोण आणि खरातने हे पैसे कुठे गुंतवले? या प्रश्नांची उत्तरे जोपर्यंत मिळत नाहीत, तोपर्यंत पीडित महिलांना खऱ्या अर्थाने न्याय मिळणार नाही. अशोक खरात प्रकरण हे केवळ एका व्यक्तीपुरते मर्यादित नसून, ते एका मोठ्या गुन्हेगारी टोळीचे लक्षण आहे. ‘हिंदवार्ता न्यूज’ या प्रकरणाच्या प्रत्येक अपडेटवर बारीक लक्ष ठेवून आहे.
Leave a comment