क्राईम जगत

क्षुल्लक कारणावरून राडा: तरुणाच्या डोक्यात दगड घालून केले जखमी

अजय टप

मोताळा, (प्रतिनिधी): तालुक्यातील काबरखेड शिवारात एका तरुणाला शांत राहण्यास सांगितल्याच्या कारणावरून वाद होऊन, आरोपीने तरुणाला बेदम मारहाण करत त्याच्या डोक्यात दगड मारून गंभीर जखमी केले. तसेच त्याच्या दुचाकीची मोडतोड करून नुकसान केले आणि आईला जिवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी बोराखेडी पोलीस स्टेशनमध्ये योगेश भानदास सोनुने याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काबरखेड येथील रहिवासी असलेले वैभव भास्कर हिवाळे (वय २८ वर्षे) हे १९ फेब्रुवारी २०२६ रोजी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास आपल्या शेतात काम करत होते. यावेळी त्याच गावातील आरोपी योगेश भानदास सोनुने हा त्या ठिकाणी आला आणि मोठमोठ्याने आरडाओरडा करू लागला. वैभव हिवाळे यांनी त्याला शांत राहण्यास सांगितले, मात्र याचा राग आल्याने योगेशने वैभवला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

दोघांमध्ये शाब्दिक वाद वाढल्यानंतर आरोपीने वैभवला धक्काबुक्की केली. इतक्यावरच न थांबता, आरोपीने तिथे उभी असलेली वैभवची ‘फॅशन प्रो’ मोटारसायकल दगडाने ठेचून तिचे अंदाजे ५ हजार रुपयांचे नुकसान केले. जेव्हा वैभव आपल्या दुचाकीचे होणारे नुकसान वाचवण्यासाठी पुढे गेला, तेव्हा आरोपी योगेशने आपल्या हातातील दगड वैभवच्या डोक्यात घातला. या हल्ल्यात वैभवच्या डोक्याच्या मागील बाजूस गंभीर जखम होऊन रक्तस्त्राव झाला. जखमी अवस्थेत वैभवने घर गाठले आणि घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला. वैभवच्या आईने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला आणि योगेशला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र, संतापलेल्या आरोपीने वैभवच्या आईलाही जिवे मारण्याची धमकी दिली. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनेनंतर जखमी वैभव हिवाळे याला ग्रामीण रुग्णालय (मोताळा) येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार पूर्ण झाल्यानंतर, २० मार्च २०२६ रोजी वैभवने बोराखेडी पोलीस स्टेशन गाठून आपबिती सांगितली. फिर्यादीच्या तोंडी रिपोर्टवरून आणि वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे, बोराखेडी पोलिसांनी आरोपी योगेश भानदास सोनुने विरुद्ध भारतीय न्याय संहिताच्या कलम ११८ (१), ११५ (२), ३५२, ३५१ (२), ३२४ (४) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार अमोल खराडे हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *