Home क्राईम जगत लोणार: जमिनीच्या वादातून गंधारी येथे तुंबळ हाणामारी
क्राईम जगत

लोणार: जमिनीच्या वादातून गंधारी येथे तुंबळ हाणामारी

लोणार (प्रतिनिधी): तालुक्यातील गंधारी येथे जुन्या जमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील सदस्यांनी मिळून आपल्या नातेवाईकांवर लाठ्याकाठ्यांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मारहाणीत फिर्यादी, त्यांची पत्नी, ७ वर्षांचा मुलगा आणि भावाला गंभीर दुखापत झाली असून, आरोपींनी अश्लील शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याने परिसरात खळबळ माजली आहे. याप्रकरणी लोणार पोलिसांनी तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

गंधारी येथील रहिवासी दिनकर नाथा घुले (वय ३२ वर्षे) आणि आरोपी संजय ज्ञानबा चाटे, विजय पंजाब चाटे व द्वारका ज्ञानबा चाटे हे एकमेकांचे नातेवाईक असून शेजारी-शेजारी राहतात. त्यांच्यामध्ये जागेच्या बांधकामावरून जुना वाद सुरू आहे. दिनकर घुले आणि त्यांची पत्नी मीरा हे दोघे आपल्या घराचे बांधकाम करण्यासाठी टाकलेली गिट्टी पसरलेली असल्याने ती जमा करत होते. यावेळी आरोपींनी तेथे येऊन “ही जागा आमची आहे, येथे बांधकाम करायचे नाही,” असे म्हणत वाद उकरून काढला. वादाचे रूपांतर लवकरच मोठ्या हाणामारीत झाले. आरोपींनी फिर्यादी दिनकर घुले आणि त्यांच्या पत्नीला अश्लील शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपी क्र. १ संजय चाटे याने हातातील काठीने दिनकर यांच्या पाठीवर आणि कपाळावर जबर प्रहार केला. संतापजनक बाब म्हणजे, या वादात आरोपीने दिनकर यांचा ७ वर्षांचा मुलगा वीर दिनकर घुले यालाही सोडले नाही; त्याच्या उजव्या हाताच्या कोपरावर काठीने मारून त्याला जखमी केले. इतकेच नव्हे तर, आरोपी क्र. ३ द्वारका चाटे हिने फिर्यादीच्या अंगावर मिरचीची चटणी फेकून त्यांना बेजार केले. या झटापटीत फिर्यादीच्या पत्नीची सोन्याची पोतही तुटून गहाळ झाली आहे. भांडण विकोपाला गेल्याचे पाहून दिनकर यांची आई आणि भाऊ पांडुरंग घुले हे सोडवण्यासाठी धावले. मात्र, आरोपी विजय चाटे याने हातातील काठीने पांडुरंग यांच्या हातापायावर आणि पाठीवर सपासप वार केले. आरोपींनी अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ करत “तुम्हाला जीवे मारल्याशिवाय सोडणार नाही,” अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी दिनकर घुले यांनी लोणार पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११८ (१), २९६, ११५, ३५१ (२), ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार गजानन सानप हे करीत आहेत. या घटनेमुळे गंधारी गावात तणावाचे वातावरण असून पोलीस परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

जागतिक वारसास्थळ ‘अजिंठा’ परिसरात देहविक्रीचा विळखा

अभिनय बोर्डे धाड, (प्रतिनिधी): जगाच्या नकाशावर आपल्या लेण्यांसाठी आणि कलेसाठी प्रसिद्ध असलेले...

३ लाखांच्या मुद्देमालासह आरोपी २४ तासांत गजाआड

खामगाव,(प्रतिनिधी):हॉटेल मालक घरी अंघोळीला गेल्याची संधी साधून हॉटेलमधील लॅपटॉप, टॅब आणि कार...

बुलढाणा जिल्हा हादरला! अवघ्या २४ तासांत पुन्हा ५ जण गायब

अजय टप मलकापूर,(प्रतिनिधी): शांतता आणि सुव्यवस्थेसाठी ओळखल्या जाणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यात गेल्या दोन...

खळबळजनक: ‘तू मला पसंत नाहीस, मला दुसरं लग्न करायचंय’

अजय टप  शेगाव,(प्रतिनिधी): भारतीय संस्कृतीत लग्नाला पवित्र बंधन मानले जाते, मात्र याच...