खेळ व मनोरंजन

बुलढाण्यात घुमली ‘अस्मिता’ तलवारबाजीची गर्जना!

बुलढाणा,(प्रतिनिधी): क्रीडा क्षेत्रातील महिलांच्या सहभागाला नवा आयाम देण्यासाठी केंद्र सरकारच्या ‘खेलो इंडिया’ उपक्रमांतर्गत बुलढाणा जिल्हा तलवारबाजी असोसिएशनच्या वतीने आयोजित ‘खेलो इंडिया अस्मिता लीग’ अत्यंत उत्साहात पार पडली. रविवारी, २२ मार्च रोजी स्थानिक शरद कला महाविद्यालयाच्या इनडोअर हॉलमध्ये जिल्ह्यातील सुमारे १०० महिला खेळाडूंनी आपल्या तलवारीचे पातं परजत उपस्थितांच्या नजरा खिळवून ठेवल्या.
स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा क्रीडाधिकारी बाळकृष्ण महानकर यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शरद कला महाविद्यालयाच्या अध्यक्षा सिंधूताई विष्णूपंत पाटील होत्या. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून राजर्षी शाहू मल्टिस्टेट बँकेच्या अध्यक्षा मालतीताई शेळके, तालुका क्रीडाधिकारी मंडलेसर आदी मान्यवर उपस्थित होते. उद्घाटनप्रसंगी बोलताना मान्यवरांनी महिला खेळाडूंच्या जिद्दीचे कौतुक केले. खेळामुळे केवळ शारीरिक क्षमताच नाही, तर आत्मविश्वासही वाढतो, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
या स्पर्धेत बुलढाणा जिल्ह्यातील विविध भागांतून आलेल्या १०० महिला खेळाडूंनी सहभाग नोंदवला. फॉईल, ईपी आणि साबरे अशा विविध प्रकारांत खेळाडूंनी आपला कौशल्याचा कस लावला. ग्रामीण भागातील मुलींनी ज्या आत्मविश्वासाने तलवारीची चाल दाखवली, ती पाहता जिल्ह्याला तलवारबाजीचा मोठा वारसा लाभल्याचे दिसून आले.
स्पर्धेच्या समारोप सत्रात यशस्वी खेळाडूंना मेडल आणि ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. शरद कला महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष प्राचार्य श्री. विष्णूपंत पाटील यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून नायब तहसीलदार श्री. सुनील आहेर, जिल्हा संघटनेचे उपाध्यक्ष मयूर बाहेर आणि जिल्हा रस्सीखेच संघटनेचे सचिव श्रीराम निळे उपस्थित होते.
स्पर्धेचे तांत्रिक नियोजन आणि पंच म्हणून आकाश बनसोडे व शुभम सुरडकर यांनी चोख जबाबदारी पार पाडली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी गणेश सावळे, बाळकृष्ण जाधव, जीवन जाधव, अनिल वाघमारे आणि मीना जगताप यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन नितीन जेऊघाले यांनी केले, तर प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त शेषनारायण लोढे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *