मलकापुरात विवाहितेचा छळ; चारित्र्यावर संशय घेऊन ३ लाखांच्या हुंड्यासाठी अमानुष मारहाण!
अजय टप
मलकापूर (प्रतिनिधी): शहरातील मदार टेकडी परिसरात एका २३ वर्षीय विवाहितेचा हुंड्यासाठी आणि चारित्र्यावर संशय घेऊन मानसिक व शारीरिक छळ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माहेरून ३ लाख रुपये घेऊन ये, अन्यथा तुला नांदवणार नाही, अशी धमकी देत विवाहितेचा छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या ६ जणांविरुद्ध मलकापूर शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
फिर्यादी सिफा जमजम अरबाज खान (वय २३) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा विवाह अरबाज खान असलम खान याच्याशी झाला होता. लग्नानंतर काही दिवसांतच पती अरबाज याने सिफा यांच्या चारित्र्यावर संशय घेण्यास सुरुवात केली. संशयाचे भूत डोक्यात घालून तो तिला वारंवार मारहाण करत असे. एवढ्यावरच न थांबता, ‘मला मेडिकलचे दुकान टाकायचे आहे, त्यासाठी तुझ्या माहेरून ३ लाख रुपये घेऊन ये’ असा तगादा पतीने लावला होता. पैसे न आणल्यास जीवे मारण्याची आणि घरातून काढून देण्याची धमकीही तिला वारंवार दिली जात होती. या छळामध्ये केवळ पतीच नाही, तर सासरच्या इतर मंडळींचाही सहभाग असल्याचे समोर आले आहे. असलम खान, अफरोज बी, उजमा नईम खान, नईम खान आणि पुणे येथील नगमा राजीक शेख हे सर्वजण सिफा यांना शिवीगाळ करत असत. ‘हिला मारहाण कर’ असे म्हणून ते पतीला सतत भडकवत होते, असा खळबळजनक आरोप सिफा यांनी आपल्या तक्रारीत केला आहे.
१५ मे २०२३ ते फेब्रुवारी २०२५ या प्रदीर्घ कालावधीत सिफा यांना वेळोवेळी अमानुष त्रासाला सामोरे जावे लागले. अखेर या जाचाला कंटाळून त्यांनी पोलिसांत धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून मलकापूर शहर पोलिसांनी उपरोक्त आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम ८५, ११५(२), ३५२, ३५१(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार सुपेष झाल्टे हे करत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून हुंडाबळी घेणाऱ्या प्रवृत्तींविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.

