अकोला जिल्ह्यात ‘मिशन लक्षवेध’ अंतर्गत क्रीडा प्रतिभा विकास केंद्रासाठी निवड चाचणी
पुष्पक मानकर
अकोला,(प्रतिनिधी): राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार खेळाडू निर्माण करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत ‘मिशन लक्षवेध’ योजना राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत अकोला जिल्ह्यात ‘जिल्हा क्रीडा प्रतिभा विकास केंद्र’ कार्यान्वित करण्यात येणार असून, यामध्ये वेटलिफ्टिंग, बॉक्सिंग, आर्चरी (धनुर्विद्या) आणि मैदानी खेळांसाठी खेळाडूंची निवड केली जाणार आहे.
‘मिशन लक्षवेध’ ही एक त्रिस्तरीय योजना असून राज्य स्तरावर हाय परफॉर्मन्स सेंटर, विभाग स्तरावर स्पोर्ट एक्सलन्स सेंटर आणि जिल्हा स्तरावर क्रीडा प्रतिभा विकास केंद्र अशी याची रचना आहे. निवड झालेल्या खेळाडूंना तज्ञ समितीद्वारे प्रशिक्षण दिले जाईल. या योजनेंतर्गत खेळाडूंचा आहार, गणवेश, क्रीडा साहित्य, स्पर्धा प्रवास खर्च, वैद्यकीय उपचार आणि विम्याचा संपूर्ण खर्च शासनातर्फे केला जाणार आहे.
जिल्हा क्रीडा संकुल, स्व. वसंत देसाई स्टेडियम, अकोला येथे सकाळी ८ वाजता या चाचण्या पार पडतील. ९ एप्रिल २०२६ रोजी मैदानी खेळ आणि आर्चरी (धनुर्विद्या), १० एप्रिल २०२६ रोजी वेटलिफ्टिंग आणि बॉक्सिंग स्पर्धा पार पडणार आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ३१ डिसेंबर रोजी खेळाडूचे वय २१ वर्षांखालील असावे. खेळाडू महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे अनिवार्य आहे. किमान राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग किंवा पदक प्राप्त खेळाडू असणे आवश्यक आहे.
इच्छुक पात्र खेळाडूंनी आपले अर्ज विहित नमुन्यात सर्व आवश्यक कागदपत्रांसह (जन्म दाखला, आधार कार्ड, क्रीडा कामगिरी प्रमाणपत्र, फिटनेस सर्टिफिकेट इ.) ७ एप्रिल २०२६ पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय (अकोला) येथे कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष सादर करायचे आहेत. अधिक माहितीसाठी खेळाडू श्रीमती नलिनी जाधव किंवा राजेश गावंडे यांच्याशी संपर्क साधावा, तसेच जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी सतीशचंद्र भट यांनी केले आहे.

