अशोक खरातच्या ‘पापसाम्राज्या’वर आता ED ची नजर!
मुंबई,(प्रतिनिधी): आध्यात्मिक ओढ आणि श्रद्धेच्या नावाखाली सामान्यांची फसवणूक करणाऱ्या अशोक खरात उर्फ ‘भोंदू बाबा’चे प्रकरण आता केवळ लैंगिक शोषणापुरते मर्यादित राहिलेले नाही. या प्रकरणाला आता राजकीय आणि आर्थिक गुन्हेगारीचे भीषण वळण मिळाले आहे. विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणातील प्रचंड आर्थिक उलाढाल आणि ‘मनी लाँड्रिंग’चा वास आल्याने आता अंमलबजावणी संचालनालय (ED) मैदानात उतरण्याच्या तयारीत आहे. खरातने श्रद्धेचा बाजार मांडून जमवलेला कोट्यवधींचा काळा पैसा एका विशिष्ट ‘ट्रस्ट’च्या माध्यमातून पांढरा केल्याचा दाट संशय व्यक्त केला जात आहे.
श्रद्धेच्या नावाखाली ‘ब्लॅक मनी’चे रॅकेट?
अशोक खरातने गेल्या काही वर्षांत उभी केलेली मालमत्ता कोणत्याही सामान्य अध्यात्मिक गुरूच्या उत्पन्नापेक्षा कैक पटीने जास्त आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, खरातने एका चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली होती. या ट्रस्टला मिळणाऱ्या देणग्या आणि त्यातून होणारा खर्च यांचा ताळमेळ बसत नसल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. परदेशातून आलेला निधी आणि निनावी देणग्यांचा वापर करून खरातने बेनामी मालमत्ता खरेदी केल्याचा संशय आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, खरातच्या या आर्थिक व्यवहारांमध्ये महाराष्ट्रातील काही बड्या राजकारण्यांचे हितसंबंध गुंतलेले असल्याची चर्चा मंत्रालयाच्या वर्तुळात रंगली आहे. हा पैसा नेमका कोणाचा होता आणि तो कोणाच्या सांगण्यावरून फिरवला जात होता, याचा शोध आता ED घेणार आहे.
SIT च्या ताब्यात ३०० हून अधिक ‘डर्टी’ व्हिडिओ!
या प्रकरणाचा तपास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेली विशेष तपास पथक (SIT) सध्या युद्धपातळीवर काम करत आहे. खरातच्या आश्रमातून आणि डिजिटल उपकरणांमधून ३०० हून अधिक व्हिडिओ जप्त करण्यात आले आहेत. हे केवळ व्हिडिओ नाहीत, तर खरातच्या कृत्यांचे जिवंत पुरावे आहेत. यामध्ये अनेक महिलांचे शोषण आणि काही प्रतिष्ठित व्यक्तींच्या उपस्थितीचे चित्रण असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे तपास यंत्रणेतील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. हे व्हिडिओ खरातने केवळ स्वतःच्या विकृत आनंदासाठी बनवले होते की, संबंधितांना ‘ब्लॅकमेल’ करण्यासाठी याचा वापर केला जात होता? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचे मोठे आव्हान SIT समोर आहे. ३०० व्हिडिओंची ही संख्या पाहून संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे.
राजकीय भूकंप होण्याची शक्यता!
अशोक खरातच्या आश्रमात अनेकदा राजकीय नेत्यांच्या गाड्यांचा राबता असायचा. ‘आशीर्वाद’ घेण्याच्या बहाण्याने अनेक पांढरपेशी नेते खरातच्या संपर्कात होते. जर ED ने या प्रकरणाचा ताबा घेतला, तर पैशांचा माग काढताना अनेक नेत्यांच्या घरापर्यंत तपास पोहोचू शकतो. खरात हा केवळ एक मोहरा असून त्याच्या मागे मास्टरमाइंड दुसरेच कोणीतरी आहे का? हा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
समाजाचा विश्वासघात आणि कायद्याचा बडगा
लोकांच्या श्रद्धेशी खेळणाऱ्या अशा भोंदू बाबांना आता कायद्याचा धाक उरलेला नाही का? असा संताप व्यक्त होत आहे. पीडित महिलांनी धैर्याने पुढे येऊन दिलेल्या तक्रारीनंतर आता या प्रकरणाची व्याप्ती वाढत चालली आहे. अशोक खरातने धर्माच्या आडून जे ‘पापसाम्राज्य’ उभे केले होते, त्याचे बुरुज आता एकामागून एक कोसळू लागले आहेत. राज्य सरकारने हे प्रकरण अत्यंत गांभीर्याने घेतले असून, गृहखात्याने SIT ला पूर्ण अधिकार दिले आहेत. मात्र, आता ED च्या संभाव्य एन्ट्रीमुळे हे प्रकरण ‘लोकल’ न राहता ‘नॅशनल’ स्तरावर गाजणार, हे निश्चित झाले आहे.
आता लक्ष कुणाकडे?
संपूर्ण राज्याचे लक्ष आता SIT च्या अहवालाकडे आणि ED च्या अधिकृत कारवाईकडे लागले आहे. ज्या ३०० व्हिडिओंनी खळबळ उडवून दिली आहे, त्यातून कोणाचे चेहरे समोर येतात आणि या ‘ब्लॅक मनी’च्या जाळ्यात कोणते मासे अडकतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

