अकोला

७.५ लाखांच्या कॉपर केबल चोरीचा १२ तासांत छडा, दोन आरोपी अटकेत

पुष्पक मानकर

अकोला,(प्रतिनिधी): बार्शीटाकळी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील ‘मेघा इंजिनिअरिंग’च्या गोडाऊनमधून झालेली मोठ्या प्रमाणावरील कॉपर केबलची चोरी उघडकीस आणण्यात अकोला स्थानिक गुन्हे शाखेला अवघ्या १२ तासांत यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी ७ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

जलालाबाद (ता. बार्शीटाकळी) येथील ‘मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रा लि.’ या कंपनीच्या सोलर प्लांट इन्स्टॉलेशन गोडाऊनमधून अज्ञात चोरट्यांनी महागड्या केबलचे ड्रम लंपास केले होते. यामध्ये ७० स्क्वेअर एम.एम.चा मोठा अर्थिंग केबल ड्रम (किंमत ६.५ लाख) आणि ४ स्क्वेअर एम.एम.चा डी.सी. केबल ड्रम (किंमत २.२५ लाख) असा एकूण ८,७५,०००/- रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. याप्रकरणी बार्शीटाकळी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी या चोरीचा तपास करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. तपासादरम्यान तांत्रिक माहिती आणि गोडाऊनमधील कर्मचाऱ्यांच्या चौकशीवरून संशयाची सुई तिथेच काम करणाऱ्या संदीप उमेश राय (वय २७ वर्षे) रा.सारीपूर, जि.बक्सार, (बिहार) याच्याकडे वळाली. पोलिसांनी संदीपला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता, त्याने चोरीचा माल शहेजाद बेग सलीम बेग (वय ३२ वर्षे) रा. बादशह नगर (पातूर) याला विकल्याची कबुली दिली. पोलिसांनी तातडीने पातूर येथून शहेजाद बेग याला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून ७० स्क्वेअर एम.एम.चा अर्थिंग केबल ड्रम, डी.सी. केबलचे दोन पॅकिंग ड्रम आणि ५ रिकामे ड्रम असा एकूण ७.५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला.

ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि गोपाल जाधव, दशरथ बोरकर, गणेश पांडे, गोकुळ चव्हाण, उमेश पराये, अन्सार शेख, स्वप्नील खेडकर, आकाश मानकर आणि मनीष ठाकरे यांनी पार पाडली. आरोपी आणि जप्त केलेला मुद्देमाल बार्शीटाकळी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आला असून, पुढील तपास पोउपनि बाळू पवार हे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *