मलकापूर आणि देऊळगाव राजा येथे भीषण अपघात
मलकापूर,(प्रतिनिधी): जिल्ह्यात रस्ते अपघातांचे सत्र सुरूच असून, मलकापूर शहर आणि देऊळगाव राजा पोलीस स्टेशन अंतर्गत दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दुचाकीस्वारांना जोरदार धडक देऊन वाहनचालक पसार झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या दोन्ही प्रकरणांत पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून तपास सुरू केला आहे.
मलकापूर: अज्ञात दुचाकीच्या धडकेत दोघे जखमी
मलकापूर शहर पोलीस स्टेशन हद्दीत तुलसी ज्वेलर्ससमोर बुलढाणा रोडवर हा अपघात घडला. फिर्यादी वैभव राजेंद्र वाशीमकर (वय २९ वर्षे) रा. मोताळा हे त्यांचे साले भूषण संतोष बानाईत यांच्यासह दुचाकी क्रमांक एमएच-२८-सीबी-१०१३ ने रेल्वे स्टेशनकडून माता महाकाली नगरकडे जात होते. यावेळी मागून येणाऱ्या एका अज्ञात भरधाव मोटारसायकलने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. या धडकेत दोघेही रस्त्यावर कोसळले. वैभव वाशीमकर यांच्या पाठीला व कानाला, तर भूषण बानाईत यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. उपस्थितांनी त्यांना तातडीने उपजिल्हा रुग्णालय (मलकापूर) येथे दाखल केले. अपघात घडल्यानंतर अज्ञात चालक गाडीसह पळून गेला असून, या प्रकरणी मलकापूर शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार अमोल शेले हे करत आहेत.
देऊळगाव राजा: लोडिंग वाहनाने सोन्याच्या व्यापाऱ्याला फरफटत नेले
दुसरी घटना देऊळगाव राजा येथील काळी पिवळी स्टॉपजवळ घडली असून, येथे एका लोडिंग वाहनाने दुचाकीला धडक दिली. फिर्यादी स्मितेश संतोष मांडोत (वय ४५ वर्षे) रा.सिव्हील कॉलनी हे त्यांच्या बजाज चेतक स्कुटी क्रमांक एमएच-२८-२३०० ने जात असताना लोडिंग वाहन क्रमांक एमएच-२८-बीबी-५६२० च्या चालकाने त्यांना पाठीमागून धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, फिर्यादी वाहनासोबत चक्क छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत फरफटत गेले. या अपघातात मांडोत यांच्या डाव्या पायाला आणि हाताला गंभीर जखमा झाल्या आहेत. उपचार घेतल्यानंतर त्यांनी आता याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. चालक वाहन सोडून घटनास्थळावरून पसार झाला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम २८१, १२५ (A), १२५ (B) सह मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार विनोद गवई हे करत आहेत.

