खळबळजनक: ‘तू मला पसंत नाहीस, मला दुसरं लग्न करायचंय’
अजय टप
शेगाव,(प्रतिनिधी): भारतीय संस्कृतीत लग्नाला पवित्र बंधन मानले जाते, मात्र याच नात्याला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना खामगाव येथील मंगलमूर्ती नगरमध्ये उघडकीस आली आहे. “तू मला पसंत नाहीस, मला दुसरे लग्न करायचे आहे,” असे म्हणत स्वतःच्या पत्नीचा मानसिक आणि शारीरिक छळ करणाऱ्या नराधम पतीसह चिथावणी देणाऱ्या सासरच्या सहा जणांविरुद्ध शेगाव ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस सूत्राकडून प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार आरती श्रीकृष्ण (वय २८ वर्षे) रा. मंगलमूर्ती नगर, खामगाव यांचा विवाह ९ मार्च २०१५ रोजी आरोपी श्रीकृष्ण देवराव हडे याच्याशी झाला होता. संसाराची स्वप्ने उराशी बाळगून सासरी नांदायला गेलेल्या आरती यांना काही दिवसांतच पतीच्या क्रूर मानसिकतेचा सामना करावा लागला. आरोपी पती श्रीकृष्ण हडे याने “तू मला आवडत नाहीस, मला दुसरे लग्न करायचे आहे,” असा तगादा लावून आरती यांचा मानसिक छळ सुरू केला. केवळ इतक्यावरच न थांबता, क्षुल्लक कारणावरून त्यांना बेदम मारहाण करणे, अश्लील शिवीगाळ करणे आणि शारीरिक त्रास देणे हा या नराधमाचा नित्यक्रम झाला होता.
नातेवाईकांकडून आगीत तेल ओतण्याचे काम!
या छळवणुकीत पतीला साथ देणारे त्याचे नातेवाईकही तितकेच जबाबदार असल्याचे समोर आले आहे. आरोपी क्र. २ ते ६ यांनी आरती यांचा संसार सावरण्याऐवजी पतीला अधिक चिथावणी दिली. या छळामुळे पीडित विवाहितेचे आयुष्य उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर होते. अखेर सहनशक्तीचा अंत झाल्याने आरती यांनी न्यायासाठी पोलिसांचे दार ठोठावले.
‘भरोसा सेल’च्या चौकशीनंतर पोलिसांचा बडगा
सदर प्रकरण अत्यंत गंभीर असल्याने याची तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील ‘भरोसा सेल’ (महिला व बाल अपराध प्रतिबंधक कक्ष) कडे करण्यात आली होती. भरोसा सेलच्या सखोल चौकशीनंतर आणि वरिष्ठ कार्यालयाने पाठवलेल्या पत्राच्या आधारे, शेगाव ग्रामीण पोलिसांनी आरोपी श्रीकृष्ण देवराव हडे (पती), देवराव हडे, ज्योती रामेश्वर सोळंके, जयश्री डाबेराव, भास्कर देवराव हाडे, नानीबाई देवराव हाडे यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ८५, ३५२, ३५१(२), ३५१(३) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस अंमलदार मुबीनशहा हे करीत आहेत.

