जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली; महावीर जयंतीदिनी मटण विक्री करणाऱ्यावर पोलिसांची मोठी कारवाई!
बुलढाणा,(प्रतिनिधी): प्रशासनाने घातलेले निर्बंध आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला धुडकावून लावणाऱ्या एका मटण विक्रेत्यावर बुलढाणा शहर पोलिसांनी जोरदार कारवाई केली आहे. महावीर जयंतीच्या पवित्र दिवशी, जेव्हा संपूर्ण जिल्ह्यात मांस विक्रीवर बंदी घालण्यात आली होती, अशा वेळी सार्वजनिक ठिकाणी उघडपणे मटण विक्री करणाऱ्या शेख शाहरुख शेख बाबर (वय ३० वर्षे) याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
महावीर जयंती निमित्त ३१ मार्च २०२६ रोजी जिल्हाधिकारी, बुलढाणा यांनी विशेष आदेश जारी करून मांस विक्रीवर बंदी घातली होती. मात्र, या आदेशाला ठेंगा दाखवत आरोपी शेख शाहरुख हा बस स्टँड ते धाड नाका रस्त्यावरील स्त्री रुग्णालयाच्या गेटजवळ उघडपणे मटण विक्री करत असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस उपनिरीक्षक रवी मोरे आणि पोलीस अंमलदार विशाल बनकर यांनी पंचांसमक्ष तातडीने स्त्री रुग्णालयाजवळ छापा टाकला. त्यावेळी आरोपी लोकांच्या नजरेस पडेल अशा पद्धतीने चिकन आणि मटणाचे दुकान उघडे ठेवून विक्री करताना रंगेहात पकडला गेला. पोलिसांनी आरोपीस जाब विचारला, तेव्हा त्याने “मला हॉटेल आणि ढाब्यांची ऑर्डर असल्याने मी बोकड कापला” असा अजब बनाव रचला. मात्र, कायद्याचा बडगा उगारताच त्याचे सर्व बहाणे फोल ठरले. पोलिसांनी घटनास्थळावरून वजन काटा जप्त केला असून आरोपीला ताब्यात घेतले.
या प्रकरणी पोलीस अंमलदार विशाल चंद्रशेखर बनकर यांच्या तक्रारीवरून बुलढाणा शहर पोलिसांनी आरोपी शेख शाहरुख शेख बाबर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिताचे कलम २२३, १०५ सह ११७ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस अंमलदार संदीप कायंदे हे करीत आहेत.